परप्रांतीय
द्वारकानाथ संझगिरी
एके काळी ‘परप्रांतीय’ हा शब्द फार प्रेमाने उच्चारला जात नव्हता. आज मात्र तो शब्द करुणेने ओथंबलेला आहे.
ती सात महिन्याचं बाळ पोटात घेऊन कसारा घाट चढणारी बाई.
ती कडकडीत उन्हात चालणाऱ्या बापाला बिलगून दूरवरच्या घराकडे निघालेली लहान मुले.
तो लखनौच्या रस्त्यावर आईला पाठीवर घेऊन स्वतःचं घर शोधत निघालेला मुलगा.
चालताना दमुन रुळावर झोपल्यावर तिथेच मालगाडीखाली चिरडून मेलेली माणसं.
अशी अनंत दृश्यं वाईट स्वप्नाप्रमाणे पुन्हापुन्हा आपल्याला छळतात. त्या प्रत्येक दृश्यात मी स्वतःला, माझ्या बायकोमुलांना, सुनांना, नातवांना उभं करून पाहिलं आणि माझा बांध फुटला. न पाहिलेल्या माणसासाठी डोळ्यात अश्रू फार कमी वेळा येतात. पण दगडानेसुध्दा ढसाढसा रडण्याची ती दृश्यं होती. जगापुढे ही दृश्यं ही आपल्या देशाची चांगली जाहिरात नव्हती. महासत्ता व्हायची इच्छा असणाऱ्या देशाला हे ललामभूत नव्हतं. ह्यात केंद्र किंवा राज्य सरकारचं किती चुकलं ह्या राजकीय धुळवडीत मला सामील व्हायचं नाही. पण एक गोष्ट मला पुन्हा एकदा पटली की कुणी ह्या देशात गरीब मजूर म्हणून जन्माला येऊ नये.
एखादा माणूस आपल्यासमोर उभा राहिला की आपलं पहिलं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे जातं आणि शेवटी पायाकडे. आपल्या समाजाचंही तसंच आहे. आपले मजूर हे समाजाचे पाय आहेत. कष्टाचं काम तेच करतात. पण समाजाला कौतुक असतं ते श्रीमंत, भांडवलशाही आणि तेजःपुंज चेहऱ्यांचं. त्यांच्या राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणाऱ्या बुद्धिमत्तेचं. पण त्यासाठी राबणाऱ्या पायांना कोण किंमत देतं? त्यांना पगाराच्या रुपात एक बुटाचा जोड फेकला की ह्या बुद्धीमंत मंडळींचं कर्तव्य संपतं. पुन्हापुन्हा मला जाणवतं की तळाच्या माणसाचा विचार हा नेहमीच सर्वात शेवटी होतो.
माझ्या लहानपणापासून आजपर्यंत ह्यात बदल झालेला नाही. मी आयुष्यात सर्व राजकीय प्रणाल्या अनुभवल्या. साम्यवाद, समाजवाद, मुक्त अर्थव्यवस्था, हिंदुत्ववाद वगैरे वगैरे. पण यातील कोणत्याही प्रणालीत तळाचा माणूस होता तिथेच राहिला. ‘मजूर म्हणून जन्माला आला आणि मजूर म्हणून मेला.’ ह्यापेक्षा जास्त त्याच्या थडग्यावर लिहिण्यासारखं काहीही नाही. अशी कोट्यावधी माणसं ह्या देशात जन्मली आणि मेलीपण. अशी माणसं ह्या देशात आहेत याची जाणीव आपल्याला पहिल्यांदा या महामारीने करून दिली. त्यांच्यासाठी या समाजाने पहिल्यांदा अश्रू ढाळले. हे उस्फुर्त होतं. कुणा नेत्याला ते सांगावं लागलं नाही. समाजाला हृदय आहे हे त्या निमित्ताने जाणवलं.
मला सांगा, लॉकडाऊन सुरू झाला तेंव्हा होते हे मजूर आपल्या डोक्यात? सर्वत्र चर्चा होती ती व्हायरस, लस, औषधं, सैनिक झालेले डॉक्टर्स, चीनची नादान वृत्ती या विषयांची. मग विचारवंत अर्थशास्त्रावर बोलायला लागले. जीडीपी, इकॉनॉमिक पॅकेज, इंटरेस्ट रेट वगैरेची चर्चा झाली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये मजुरांनी स्टेशन्सवर गर्दी केली तेंव्हा आपल्याला जाग आली, कारण ते या विषाणूला आपल्या घरात घेऊन येतील ही भीती आपल्याला होती. मग पुन्हा आपल्याला डुलकी लागली. अख्खा मध्यमवर्ग हा घरचं जेवण, ‘युट्युब’वरची रेसिपी, ‘एफबी लाइव्ह’वरचे सेलेब्रिटी, वेगवेगळ्या वेब सिरीज ह्यात गर्क होता. अधूनमधून मजूर एकत्र येऊन त्यांच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून द्यायचे. तेवढ्यापुरती आपली, सरकारची आणि न्यूज चॅनल्सची झोप मोडायची आणि मग पुन्हा अख्ख्या मध्यमवर्गाला डुलकी यायची. समाज जागा झाला मजुरांचा असहाय्य लाँग मार्च सुरू झाल्यावर. मग मात्र समाज गलबलला.
माझ्या पिढीने काळ खूप बदलताना पहिला. माझ्या लहानपणी श्रीमंतीची व्याख्या टाटा-बिर्ला ही होती. ती आता अंबानी-अदानी झाली असली तरी त्या क्षितिजावर त्यांच्या व्यतिरिक्त अनेक तारे आहेत. सचोटीने धंदा करून भरभराट करून घेता येते हे टाटा, नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी वगैरेंनी दाखवून दिलंय. मध्यमवर्ग तर केवढा वाढला. माझ्या लहानपणचा मध्यमवर्ग आणि आजचा मध्यमवर्ग ह्यात प्रचंड फरक आहे. उच्च मध्यमवर्ग आणि श्रीमंत यातली सीमारेषाही पुसट झालीये. बरेच नवश्रीमंत विचाराने मध्यमवर्गीय आहेत, पण खिशाने श्रीमंत. पण तळागाळातल्या समाजात किती बदल झाला?
कॉलेजात असताना साहीर लुधियानवीप्रमाणे आम्ही आशावादी होतो. ‘वो सुबह कभी तो आयेगी’ असं आम्हालाही वाटायचं.
जिस सुबह की खातिर जुग-जुग से, हम सब मर-मर के जीते हैं
जिस सुबह की अमृत की धुन में, हम ज़हर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर, एक दिन तो करम फ़रमायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...
हा स्वप्नाळूपणा होता. ती सकाळ येणं जाऊ देत, अजून झुंजुमुंजूही झालेलं नाही.
१९४० साली संगीतकार नौशाद फूटपाथवर झोपायचा. आजही कोट्यावधी माणसं फूटपाथवर झोपतात. त्या कोट्यावधी लोकांमध्ये एखादाच नौशाद होतो. समाजातली आर्थिक दरी कमी होत नाही. सामाजिक प्रतिष्ठा तर त्या मजुरांना नसतेच. आपली मुलं परदेशात शिकायला गेली की रेस्टॉरंट किंवा छोट्या दुकानात काम करतात. कारण त्या जगात सर्वसाधारणपणे अशी कामं करणारा माणूस कमी लेखला जात नाही. तिकडे क्लिनर जीन्स घालून येतो, काम करतो आणि स्वतःच्या गाडीने निघुन जातो. त्यांना ते ‘ब्ल्यू कॉलर’ म्हणतील, पण लागर प्यायला सगळे बरोबर असतील. आपल्या मनात आधी जातीप्रमाने उच्च-नीचता असते, त्यात आर्थिक विषमतेची भर पडते. आपल्याकडे काही व्यवसाय उच्च असतात काही हलके.
माझ्या मित्राला त्याच्या बायपास शस्त्रक्रियेनंतर एक डॉक्टर त्या सर्जनच्या कामाबद्दल माझ्यासमोर कुत्सितपणे म्हणाला, “नथिंग ग्रेट. इट इज जस्ट अ प्लंबिंग जॉब यार.” ह्यातून समाजाची प्लंबरकडे पाहण्याची दृष्टी जाणवते. तो हलकं काम करतो हे ध्वनित होतं. ऑस्ट्रेलियात माझ्या मुलाकडे एकदा घरातलं बेसिन त्रास देत होतं. मी मुलाला म्हटलं, "अरे, प्लंबरला बोलाव." तो म्हणाला, "थांबा. आधी मला जमतं का ते पाहतो. नाहीतर तो त्याच्या गाडीतून येईल आणि दहा मिनिटात माझे २५० डॉलर्स घेऊन जाईल." तिथे मनात उच्च-नीच भावना ही जास्त शारीरिक रंगावर असते, पण प्लंबरचा आर्थिक स्तर हा वरचा असल्याने त्याला तिथे हलकं मानत नाहीत. आपल्याकडे मजूर, आणि त्यात असंघटित मजूर हा सामाजिक आणि आर्थिक बाबतीत नेहमी हलकाच असतो. त्यात इतक्या वर्षांत फार बदल झाला नसल्याने तो अशा महामारीच्या वेळी कुणाच्या डोक्यात नसतो.
अजून एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या कामगार आणि मजूर वर्गावरचा अन्याय वेशीवर आणणारा नेताच आता शिल्लक नाही. 'ट्रेड युनियन' ही संपलेली चळवळ आहे. कधी राजकीय कारणांसाठी, तर कधी उद्योगपतींसाठी ह्या ट्रेड युनियन्स पद्धतशीरपणे संपवल्या गेल्या. त्यात स्वार्थी आणि मालकाशी हातमिळवणी करणाऱ्या क्षुद्र नेत्यांचीही कर्तबगारी आहेच. आज मला श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडिस ह्यांची आठवण येते. आज जॉर्ज असता तर ह्या मजुरांच्या बाजूने नक्की उभा राहिला असता. आत्ता त्यांच्या बाजूने उभे राहिलेले पक्षीय पोपट फक्त नक्राश्रू ढाळत होते. त्यात सत्तेकडे त्यांची बाजू समर्थपणे लावून धरणारा नेता कोणी नव्हता.
आता अर्थव्यवस्था सुधारण्याची भाषा सुरू झालीय. त्यासाठी कामगार कायदे बदलणं सुरू आहे. चीनमधले सर्व उद्योग जणू भारतात येणार असं चित्र उभं केलं जातंय. मग त्यासाठी आर्थिक उदारपणा हवा. संपत्ती निर्माण करण्याची निरंकुश संधी उद्योगपतींना द्यायला हवी. त्यासाठी मजूर हवेत. पण या परिस्थितीत मजुरांचे हक्क किती सांभाळले जातील? मालकाच्या उदारपणावर त्यांनी किती विश्वास टाकायचा? आणि राजकीय नेत्यांवरही? लॉकडाऊन झाल्यावर अनेक मालकांनी या मजुरांना एका क्षणात वाऱ्यावर सोडलं. जणू ते त्यांचे कुणीच नव्हते? माणूस वेश्येकडे जातो, शरीरसुख घेतो, पैसे फेकतो आणि निघून जातो. तितक्याच तिऱ्हाईतपणे या मजुरांना वागवलं गेलं. पुन्हा स्वत:चं काम भागवायला ते पैसे फेकतीलही. पण हे चक्र असंच चालायचं का?
आणखीन दोन बाबी मला मांडायच्या आहेत.
एक म्हणजे कोणताही माणूस शेकडो मैल चालत घराकडे जायला उद्युक्त का होतो? जेव्हा त्यांना सर्व बाजूने संकटाने वेढलं जातं. दाटीवाटी करून राहताना कोरोना व्हायची भीती. दुसऱ्या बाजूला भुकेने मरणाची भीती. या परिस्थितीत त्यांना आशेचा एकच रस्ता दिसला, घराकडे जाणारा. ते निघाले काटे तुडवत. शहरात त्यांना सरकारने, काही सेवाभावी संस्थांनी जेवण दिलं. नाही असं नाही. पण दयेच्या जेवणावर माणूस किती दिवस काढणार? खिशात पैसा नाही, हाताला काम नाही. काम मिळण्याची खात्री नाही. सर्वत्र अंधार. त्यामुळे त्यांना एकाच मिणमिणत्या दिव्याने खेचलं, त्यांचा गाव, त्यांचं घर.
पण त्यातून पुन्हा दोन संदेश जातात. एक, ज्या शहरात ते राहतात त्या शहराला त्यांच्याबद्दल प्रेम नाही, माया नाही. त्यामुळे संकटकाळात त्यांना स्वतःच्या घराची ओढ वाटली. आणि दोन, ज्या शहराने त्यांना रोजीरोटी दिली, त्याबद्दल त्यांनाही प्रेम नाही. त्यांना ते त्यांचं घर वाटतं नाही. ते परप्रांतीयच राहिले. या मातीशी एकरूप झाले नाहीत. चूक कुणाची? शहराची की त्यांची?
माझ्याकडे याचं उत्तर नाही.

Comments
Post a Comment